अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य - "जनी वावगे बोलता सुख नाही" ऍड. रोहित एरंडे ©

  अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य  -  "जनी वावगे बोलता सुख नाही"

ऍड. रोहित एरंडे ©

आपल्यापैकी बहुतेकजण हे , व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारखे  कुठलातरी  सोशल मिडिया वापरात असतो.  आपण बघितले असेल कि सोशल मिडिया हे दुधारी अस्त्र आहे. त्याचा वापर कसा करायचा हे ज्याच्यात्याच्या मनोवृत्तीवर ठरते. मात्र हल्ली ह्या माध्यमांवर खूप वेळा दुसऱ्या व्यक्तींबद्दल वेडे वाकडे लिहिले - बोलले जाते. आपल्याला राज्यघटनेने बोलण्याचे -अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे ह्याचा अर्थ आप वाटेल ते बोलायचे असे होत नाही. स्वातंत्र्य हे मंगेश पाडगावकर म्हणतात तसे "तुमचे आमचे सेम" असले पाहिजे.  असते".  आपल्याला पाहिजे तेव्हा स्वातंत्र्य आणि त्याचवेळी ते दुसऱ्याला नाही, असे "सोयीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य" करता येत नाही.    

सोशल मिडिया हा आता जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे आणि ह्या  मिडीयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच ऐरणीवर आलेले असते आणि प्रदर्शन करायला काही धरबंधच उरत नाही. एकतर स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवनातील चांगल्या वाईट घटना "अपडेट" करण्याची घाई, कि लगेचच त्यावर चांगल्या वाईट  प्रतिक्रियांच्या पाऊस पडणे लगेच सुरु होते आणि ह्या प्रतिक्रियांमध्ये बऱ्याचवेळा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे ''सोयीचे' असते हे दिसून येते.  "अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा " वापर करताना आपले सामाजिक स्थान काय ह्याचाही अनेक  वेळा विसर पडलेला दिसून येतो 

तर असे मत / प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी "फ्रिडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन" ह्या घटनात्मक अधिकारामध्ये काही कायदेशीर बंधने असावीत का? हा मुद्दा मा. सर्वोच्च न्यायालयापुढे श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार ह्या याचिकेमध्ये २०१४ सालीच उपस्थित झाला होता.  ह्या केसला  पार्श्वभूमी आहे मुंबई स्थित एका मोठ्या नेत्याच्या निधनाची. 

 मात्र एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मुंबई  बंद पुकारणे किती योग्य आहे ? अश्या आशयाचा पोस्ट दोन तरुणींनी फेसबुकवर लिहिली. ह्याचे निमित्त होऊ कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि चिडून जाऊन त्यांनी मोठी निदर्शने केली आणि शेवटी पोलिसांनि त्या दोन्ही तरुणींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-अ अन्वये गुन्हा दाखल केला. कोणत्याही स्वरूपातील आक्षेपार्ह व प्रक्षोभक माहिती किंवा एखादी माहिती खोटी आहे हे माहिती असूनसुद्धा कोणाचा अपमान करण्याच्या दृष्टीने किंवा तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने माहिती प्रसारित केली तर संबधित व्यक्तीविरुद्ध सदरील कलमाखाली ३ वर्षे कैद आणि दंडाची शिक्षा व्हायची. मात्र पोलिसांच्या ह्या कृतीवर सर्व स्तरातून टीका झाली आणि हॆ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली असल्याची ओरड झाली. अखेर काही स्वयंसेवी संस्थांनी ह्या निर्णयास मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 

कलम ६६-अ रद्द :

मात्र पुढे जाऊन अंतिम निकाल देताना मा. सर्वोच्च न्यायालयाने सदरील संपूर्ण कलम कलम ६६-अ हेच  असंवैधानिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करत असल्याचे कारण देऊन रद्दबातल ठरविले. मात्र असे असून सुद्धा कोव्हीड काळात फेक न्यूज पाठविली म्हणून सदरील कलमाखालीच व्हाट्सऍप ऍडमिनलाच अटक करण्याचे अनेक प्रकार घडले आणि अजूनही काही ठिकाणी पोलीस यंत्रणा या कलमाचा वापर करत असल्याच्या घटना दिसून येतात.

व्हॅट्सऍप ऍडमिन  - चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्याला, असे होऊ शकत नाही.

व्हाट्सअप ग्रुप मध्ये आलेल्या आक्षेपार्ह मजकुराची  ऍडमिन विरुद्धच कारवाई केली गेल्याचे प्रकार पूर्वी घडले. किशोर विरुद्ध महाराष्ट्र सरकार, ह्या केसच्या निमित्ताने असाच प्रश्नच उपस्थित झाला. एका सभासदाने व्हाट्सऍप ग्रुप वर टाकलेल्या आक्षेपार्ह आणि लैंगिक टिपण्णी असलेल्या मेसेजमुळे पोलिसांनी एफआयआर मध्ये ऍडमिनचे देखील नाव आरोपी म्हणून दाखल केले होते. त्याविरुद्धच्या आव्हान याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालायने एकाच्या चुकीसाठी दुसऱ्याला शिक्षा (व्हायकेरियस लायेबिलिटी) हे तत्व फौजदारी कायद्यामध्ये नाही ह्या तत्वाचा आधार घेऊन ऍडमिन विरुद्धची तक्रार रद्द केली. न्यायालायने पुढे नमूद केले जर असा आक्षेपार्ह मेसेज पाठविण्यामध्ये ऍडमिनचाहि सहभाग किंवा समान उद्दिष्ट होते, हे सिद्ध झाले, तरच ऍडमिन विरुद्ध कारवाई होऊ शकते. तसेच असा आक्षेपार्ह मेसेज ऍडमिनने ग्रुप मधून काढून टाकला नाही किंवा संबंधित मेम्बरलाही ग्रुप मधून काढून टाकले नाही म्हणून ऍडमिनवर कारवाई होऊ शकत नाही.

त्या पूर्वी मा. दिल्ली उच्च न्यायालने २०१६ साली आशिष भल्ला विरुद्ध सुरेश चौधरी, ह्या याचिकेच्या निमित्ताने 'फेक न्यूज साठी व्हाट्सऍप ऍडमिनला अटक करणे म्हणजे वर्तमानपत्रामध्ये एखादी बदनामीकारक बातमी अली, तर कागद निर्मात्याला अश्या बदनामीसाठी अटक करण्यासारखे आहे' असे नमूद करून व्हाट्सऍप ऍडमिनविरुद्धची कारवाई रद्द केली होती. वरील दोन्ही निर्णयासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या श्रेया सिंघल निकालाचा आधार घेतला गेला.

आपलयाला जसा मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे तसा तो दुसऱ्यांनाही आहे हे लक्षात ठेवावे. मा. सर्वोच्च न्यायालयायाने कायमच व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला आहे. एल.आय.सी. विरुद्ध मनुभाई शाह AIR १९९३ एस.सी. १७१ हा निकाल त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मनुभाई शाह ह्यांनी अभ्यासांती असे निष्कर्ष काढले होते कि एल.आय.सी.चे प्रिमिअम अवाजवी आहेत आणि त्यावर एक टिपण लिहिले, मात्र ते टिपण प्रसिद्ध करण्यास एल.आय.सी ने नकार दिला. मात्र एल.आय.सीचे हे वर्तन "अखिलाडू" असल्याचे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने ते निष्कर्ष एल.आय.सीच्या "योगक्षेम" नावाच्या मासिकामध्ये छापायला लावले. व्यक्तिस्वातंत्र्य असो व सत्ता, दोघांचा अतिरेक वाईटच.

आपण केलेली ती निकोप टीका आणि दुसऱ्याने केलेली असभ्य टीका हे ठरविण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी "आपणास चिमोटा घेतला ।तेणें कासाविस जाला । आपणावरून दुस-याला ।राखत जावे ।। कठिण शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें । तरी मग वाईट बोलावें तें । कायें निमित्य ।।" हे दासबोधातील वचनच उत्तर ठरावे. उदा. "लायकी"  म्हणायचे का "योग्यता" नाही म्हणायचे, हे तारतम्यानेच ठरवावे लागते. 

कलम ६६-अ हे रद्द झाले असले तरी आयपीसी खालील अन्य कलमांखाली कारवाई करता येते हे लक्षात घ्यावे. 

 अर्थात कुठलीही गोष्ट  चांगले कि वाईट हे त्याच्या वापरकर्त्यावर ठरते. उदा. अग्नीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करायचा का कोणाला इजा पोहोचविण्यासाठी  असो. जीवनावश्यक गोष्ट असल्यासारखी जर आपल्या प्रिय राजकीय नेत्याच्या /पक्षाच्या समर्थनार्थ उत्साहाच्या भरात काहीतरी कृति करून कायदे मोडून गुन्हे अंगावर दाखल झाल्यास , ते निस्तरताना पुढे नोकरी-धंदयासाठी किंवा परदेशी वगैरे जाताना अडचणीचे ठरू शकते , हे सामान्यांनी / कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. एखाद्या नेत्याने जाहीरपणे अपशब्द वापरणे आणि तुम्ही आम्ही वापरणे ह्यात खूप फरक असतो. 'तुम आगे बढो म्हणणारे' स्टडी रूम मध्ये आणि कार्यकर्ते कस्टडी-रूम मध्ये असे व्हायला नको. 

त्यामुळे नंतर पदरमोड करून कोर्टकचेऱ्या करण्या पेक्षा कुठलीही कृती करण्याआधी तारतम्य बाळगणे हिताचे नाही का ? कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य - "तुमचे आमचे सेम असते".  शेवटी परत एकदा "जनी वावगे बोलता सुख नाही" हे समर्थ वचनच आपल्या उपयोगी येणार आहे.


ऍड. रोहित एरंडे ©






Comments

Popular posts from this blog

प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क कोणते ? ॲड. रोहित एरंडे ©

मूलभूत हक्क पाहिजेत, मग मूलभूत कर्तव्यांची पण माहिती हवीच !!