पोलीस कारवाई आणि आपले कायदेशीर हक्क. ॲड. रोहित एरंडे ©

पोलीस कारवाई आणि आपले कायदेशीर हक्क. 


पोलीस यंत्रणा हि समाजातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीची प्रमुख यंत्रणा आहे. पण पोलीस हा सभाड म्हटला तरी एक भितीची भावना आपल्या मनात तरळून जाते. तर पोलीस कारवाई करतात म्हणजे काय ? त्यांना काय अधिकार असतात आणि आरोपीला काय अधिकार असतात हे थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. 

गुन्हा म्हणजे काय ?

फौजदारी कायद्याचे उल्लंघन करणे किंवा एखादे वर्तन हे समाज स्वास्थ्याच्या विरुध्द असेल तर तो गुन्हा असे सोप्या शब्दात म्हणता येईल आणि अश्या गुन्ह्याला शिक्षा मिळते  आणि असा गुन्हा करणाऱ्याला गुन्हेगार असे म्हणतात. म्हणतात अनैतिकता /पाप करणे आणि गुन्हा ह्या वेगळ्या गोष्टी आहेत दिलेला शब्द न पाळणे किंवा एखाद्याने केलेले उपकर विसरणे हे अनैतिक म्हणता येईल, पण गुन्हा नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट एखाद्या प्रदेशात गुन्हा असेल पण दुसऱ्या भागात असेलच असे नाही. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे वेगवेगळे कायदे आहेत. उदा. नेवाडा (लास वेगास) राज्यामधेय मोठाले कॅसिनो उभारण्यास परवानगी आहे, तर इतर बहुतांशी राज्यांमध्ये नाही तर  न्यू जर्सी राज्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या गाडीत पेट्रोल भरता  येत नाही, पण इतर राज्यांमध्ये  अशी बंदी नाही.. 

एफआयआर म्हणजे काय वॉरंट म्हणजे काय 


आता आपण भारतामधील गुन्ह्यांचे प्रकार आणि त्याची माहिती बघू. 

आपल्याकडे गुन्ह्यांचे वर्गीकरण हे दखलपात्र आणि अदखलपात्र अश्या प्रकरणमध्ये केलेले आहे. 


दखलपात्र गुन्हे : (cognizable offenses )  : उदा. चोरी, खून, बलात्कार इत्यादी.

नावाप्रमाणेच या गुन्ह्यांची  दखल पोलीसांना घ्यावीच लागते आणि ताबडतोब तपास सुरू करावा लागतो. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वॉरंटशिवाय म्हणजेच कोर्टाच्या लेखी आदेशाशिवायही पोलीस आरोपीला अटक करू शकतात.  अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये एफ.आय.आर. (FIR ) नोंदविणे पोलिसांवर बंधनकारक असते . FIR  हे First Information Report  चे संक्षिप्त रूप आहे. 


अदखलपात्र गुन्हा : उदा. शिवीगाळ करणे, क्षुल्लक कारणावरून भांडणे, मारहाण इ.

अदखलपात्र  (Non cognizable offenses) प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कोर्टाच्या हुकुमाशिवाय अटक करण्याची परवानगी पोलिसांना नसते. या गुन्ह्यासाठी वेगळे रजिस्टर ठेवले जाते आणि अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कोर्टाच्या परवानगीशिवाय एफ.आय.आर. नोंदविता येत नाही. 

एफ.आय.आर.  कोण दाखल करु शकतो?

तफक्त तुमच्या बाबतच नाही तर अन्य कोणाबाबतही गुन्हा घडत असल्याचे तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही एफ.आय.आर नोंदवू शकता. 


एफ.आय.आर कसा दाखल करतात ?


पोलिसांकडे एफ.आय.आर ची  नोंद करताना तो  दाखल करणाऱ्याचे नाव, कोना विरुध्द दाखल करायचा त्या व्यक्तीची पूर्ण माहिती , गुन्हा घडल्याची तारीख, पुरावे दिवस, वेळ  आणि घटनास्थळाची माहिती  द्यावी लागते. जर का एफ.आय.आर नोंदवून गेहण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली तर त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करता येते. 


पोलीस अटक कधी करू शकतात ?

कायद्यासमोर सर्व समान असतात. कोणत्याही व्यक्तीला, मग तो कितीही मोठा गुन्हेगार का असेल,  कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्याशिवाय अटक करता येत नाही. एक लक्षात घ्या आरोपी, सुनावणी सुरु असलेला आरोपी (under trial) आणि गुन्हा सिध्द झालेला दोषी या तिन्ही बाबी वेगवेगळयI आहेत. आपल्याकडे  जोपर्यंत आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष समजली जाते. (innocent until proven guilty )   


नागरिकांचे अधिकार :

१. कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय पोलिसांना कोणासही अटक करता येत नाही. 

२. जर कोणासही अटकेची शक्यता वाटत असेल तर अटकपूर्व जामिन कोर्टातून आधीच मिळविता  येतो

३. पोलिसांना कोणालाही अटक करताना अटकचे कारण आणि गुन्हा सांगणे  आवश्यक आहे आणि आरोपीही त्याच्या विरुध्द असलेले  अटक वॉरंट पाहण्याचा अधिकार  आहे. तसेच कोठडीमध्ये आरोपीवर जोर-जबदरदस्ती करता येत नाही. 

४.  आरोपीच्या  नातेवाइकांना, जवळच्या व्यक्तीला  किंवा मित्रांना त्या व्यक्तीच्या अटकेची माहिती देणे पोलिसांना अनिवार्य आहे. तसेच आरोपीला आपल्या वकिलाचा  कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार आहे. जर आरोपी व्यक्त दारिद्रयरेषेखालील असल्यास राज्य सरकारमार्फत त्या व्यक्तीस मोफत कायदेशीर मदत (Free  Legal  Aid ) दिली जाते.

५. पोलिसनसमोर दिलेला कबुली-जबाब ग्राह्य घाला जात नाही. 

६. अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत जवळच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपीला हजर करण्याची कायदेशीर जबाबदारी पोलिसांवर आहे. 

७. .न्यायाधिशांसमोर  नेताना पोलिस आरोपीला बेड्या घालू शकत नाही.

८.  १५ वर्षाच्या आतील मुलांना आणि महिलांना चौकशीसाठी  पोलिस ठाण्यात बोलवू शकत नाही तर महिलेला प्रश्न उत्तरे करण्यासाठी पोलिसांनी घरी जाणे आवश्यक आहे

९. पोलिस लेखी आदेशा शिवाय तपास/चौकशी कामी पोलिसठाण्यात बोलवू शकत नाही

१०. सूर्यास्ता नंतर आणि सुर्योदया आधी महिलांना अटक करता येत नाही आणि महिला आरोपीला अटक करताना महिला पोलिस सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच महिला आरोपीला अटक केल्यावर महिलांसाठीच्या वेगळ्या  खोलीत ठेवणे बन्धनकारक आहे


११. अटक केलेल्या व्यक्तीस पोलिसांच्या प्रश्नांना  उत्तरे न देता शांत राहण्याचा अधिकार आहे


१२. झडती म्हणजेच सर्च वॉरंट शिवाय पोलिस घरात घुसू शकत नाही आणि तपास करु शकत नाही

१३. अशी झडती घेताना  २ स्वतंत्र साक्षीदार सोबत असणे बंधनकारक आहे तसेच जप्त मुद्देमालाचा पंचनामा करुन त्यावर साक्षीदार आणि पोलिसांनी स्वाक्षरी करुन एक प्रत आरोपीस देणे बंधनकारक असते. 




Comments

Popular posts from this blog

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य - "जनी वावगे बोलता सुख नाही" ऍड. रोहित एरंडे ©

प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क कोणते ? ॲड. रोहित एरंडे ©

मूलभूत हक्क पाहिजेत, मग मूलभूत कर्तव्यांची पण माहिती हवीच !!