आपला प्यारा तिरंगा झेंडा फडकविताना काय काळजी घ्यावी ?
"विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा" हे गाणे तुम्हाला सर्वांना माहिती असेलच. दरवर्षी तुम्ही सर्व जण २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ह्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शाळेत जाता . बरोबर ह्या दिवशी वाटेत तुम्हाला ठिकठिकाणी झेंडे (ध्वज)विकायला ठेवलेले दिसत असतील. अश्या ह्या आपल्या झेंड्या संदर्भात काही महत्वाचे नियम आहेत ते आपल्याला माहित हवेत. आपल्या राज्य घटनेत जी काही नागरिकांची कर्तव्ये दिली आहेत त्यातील एक प्रमुख कर्तव्य म्हणजे राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे हे होय. आणि आपल्या तिरंग्याचा आपल्याकडून चुकून अपमान तर होत नाही ना, ह्या करिता नियम आणि कायदे माहिती असणे गरजेचे आहे, त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे. .
१. आपल्या राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी राष्ट्रीय ध्वज फडकविणे आणि अयोग्य वापराचा प्रतिबंध कायदा, १९५० तसेच
भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971 ह्या कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत.
२. रंग आणि आकार : आपला राष्ट्रध्वज तिरंगी आयताकृती असून त्यात सारख्या रुंदीचे तीन आयताकृती पट्टे आहेत. सर्वात वरील पट्ट्याचा रंग केसरी, मधला पांढरा तर सर्वात खालच्या पट्ट्याचा रंग हिरवा आहे. मधला पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर मध्यभागी नाविक निळ्या (नेव्ही ब्लू) रंगातील २४ समान अंतरावरील आरी असलेले अशोक चक्र असते. ध्वजाचा आकार कितीही असला तरी त्याच्या लांबी आणि उंचीचे ( रुंदीचे ) प्रमाण हे 3 : 2 असावे.
३. कोणते कापड वापरतात ?
पूर्वी, हाताने कातलेल्या आणि विणलेल्या सुती, रेशमी, खादी कापडाचा राष्ट्रध्वज असावा अशी तरतूद होती. परंतु २०२१ मध्ये ध्वज संहितेमध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार आता पॉलिएस्टर कापडाचा राष्ट्रध्वज किंवा यंत्राद्वारे बनविलेला ध्वज करण्यास संमती देण्यात आली आहे.
४. ध्वज फडकविण्याची वेळ :
कायद्यातील नवीन दुरुस्तीप्रमाणे आता खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर प्रदर्शित केलेला ध्वज योग्य ती काळजी घेऊन दिवसरात्र फडकत ठेवता येईल ! पूर्वी फक्त प्रजासत्ताक दिन किना स्वातंत्र्य दिन ह्या दिवशीच ध्वज फडकवता यायचा. मात्र ह्यासाठी नवीन जिंदाल ह्या उद्योगपतीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन सामान्य नागरिकालाही इतरदिवशीही ध्वज फडकविण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.
५. ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावि ?
ध्वज फडकवताना केशरी बाजू वर असेल. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच खराब झालेला, मळलेला किंवा चुरगळलेला ध्वज फडकवला जाऊ नये.
कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला आदर दाखविण्यासाठी ध्वज वाकवला जाणार नाही.
• सार्वजनिक इमारतीवर सरकारने दिलेल्या आदेशाव्यतिरिक्त ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात किंवा अर्ध्यावर लावण्यात येणार नाही.
• ध्वजाचा वस्त्र म्हणून कोणत्याही स्वरुपात वापर केला जाणार नाही. अनेक देशांमध्ये ध्वजाचा वापर वेष किंवा गणवेशाचा भाग किंवा अंतर्वस्त्रे, टॉवेल, हातरुमाल, म्हणून वापरण्यात येतो, जे आपल्याकडे करता येणार नाही.
ध्वजावर कोणत्याही स्वरुपाची अक्षरे लिहिली जाणार नाहीत. राष्ट्रध्वज उभारलेल्या ध्वजस्तंभावर कोणतीही वस्तू, उदा. फुले किंवा हार किंवा प्रतिक , लावू नये.
ध्वजामध्ये काहीही ठेवता येणार नाही. अपवाद म्हणजे प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिन किंवा विशेष प्रसंगी समारंभाचा भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी त्यात फक्त फुलाच्या पाकळ्या ठेवण्यास परवानगी आहे.
ध्वज जमिनीला लागणार नाही किंवा पाण्यात जाणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्यावी.
कुठलेही वाहन, रेल्वे, गाडी, नौका किंवा विमान यांच्या टपावर, वरच्या बाजूच्या किंवा मागच्या बाजूवर आच्छादन घालण्यासाठी ध्वजाचा वापर केला जाणार नाही.
राष्ट्रध्वजाला सर्वात मानाचे स्थान असते त्यामुळे इतर कोणताही झेंडा किंवा निशाण राष्ट्रध्वजाच्या बाजूला किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याहून अधिक उंचीवर असता कामा नये. ,
खराब ध्वज नष्ट करताना :
राष्ट्रध्वज खराब झाला असेल तर तो खासगीरीत्या संपूर्णपणे नष्ट केला जावा. मुलांनो तुम्ही शाळेत येताना जे झेंडे विकत घेता ना, ते नीट वापरले पाहिजेत. कार्यक्रम संपल्यावर असे ध्वज जमिनीवर टाकून देऊ नका . असे ध्वज हे खाजगीरित्या ध्वजाची प्रतिष्ठा राखून ते नष्ट करण्यात यावेत.
६. राष्ट्रध्वजाचा अपमान हा मोठा गुन्हा समजला जातो.
राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यास ३ वर्षे कैद आणि अथवा दंड होऊ शकतो.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment